सभोवतालच्या परिसरातून घडते विद्यार्थ्यांचे जीवनमान

मूल जन्माला येते तेव्हा त्याच्यावर सभोवतालच्या परिसराचा प्रभाव पडतो. आई-बाबा, आजी-आजोबा हा इतकाच त्याचा परिसर. मूल आपल्या कुटुंबातील लोकांचे निरीक्षण करत असते. जसे, की ते कसे बोलतात, कसे वागतात यावरूनच ते मूल बोलायला, वागायला शिकते.

जसजसे मूल मोठे होत जाते ते त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या इतर लोकांमध्ये, मित्रांमध्ये मिसळू लागते. यातूनच आपुलकी, जिव्हाळा, प्रेम या गोष्टी ते शिकत जाते. सोबतच इतरांना मदत करणे, मोठ्यांचा आदर करणे, छोट्यांना आधार देणे अशा बऱ्याच गोष्टीही ते शिकत असते. परिसर त्याच्या आयुष्यातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणून अनेक नवनव्या गोष्टींची भर घालत असतो.

परिसरात वावरत असताना घरातील लोकांपेक्षा, त्याच्या आई-बाबांपेक्षा वेगळे वागणे, बोलणे मुलाच्या कानावर पडत असते. मग ते कधी चांगले तर कधी वाईट असते. या गोष्टींचा त्याच्या मनावर कसा परिणाम होतो, हे त्याच्यावर होत असलेल्या किंवा आई-बाबांकडून मिळणाऱ्या संस्कारांवर अवलंबून असते. यातूनच त्याची सामाजिक जडणघडणही व्हायला सुरुवात होते.

मुलाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्याच्या जीवनात शाळा अत्यंत प्रभावशाली ठरते. शाळेमध्ये साजरे होणारे विविध दिन जसे, की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महात्मा गांधी जयंती हे राष्ट्रीय सण साजरे केल्यामुळे त्याच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना निर्माण होण्यास मदत होते. शिवजयंती उत्सव साजरी केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे आचार, विचार त्याच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. तसेच वाचन प्रेरणा दिवस, शिक्षक दिन यामुळे साहजिकच मुलाला वाचनाची, अभ्यासाची गोडी लागते आणि शिक्षकांबद्दलची ओढही निर्माण होते. एखादे ध्येय ठरवून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळावा, यासाठी या गोष्टी मुलांच्या जीवनात खूप महत्त्वाच्या भूमिका बजावतात.

शाळेमधूनच मुलांच्या शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते. यामध्ये गड किल्ल्यांना भेटी दिल्या जातात. या भेटींमधून ऐतिहासिक गोष्टींची माहिती मिळते तसेच निसर्गदर्शन घडते आणि त्यांच्या मनात निसर्गाबद्दलचे प्रेम वाढीस लागून त्याचे महत्त्व समजते. निसर्गाची काळजी कशी घ्यावी, पशुपक्षांची काळजी कशी घ्यावी हेही लक्षात येते. या सगळ्यांतून मुलांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होते.

एकंदरीत, वरील सर्वच गोष्टींचा सारासार विचार करता विद्यार्थ्यांच्या जीवनावर आजूबाजूच्या परिसराचा सकारात्मक प्रभाव पडत असतो.

 

– सौ.ज्योती अजित येनपुरे

Asst. Teacher (SSPMS Primary Day School)