वाचाल तर वाचाल

छंद म्हणजे काय ? तर आपल्या रिकाम्या वेळेत जे काम करायला आवडते त्याला छंद असे म्हणतात. त्यात गायन, नृत्य लेखन ,वाचन, चित्र काढणे, बाग काम करणे, खेळणे असे विविध प्रकारचे छंद असू शकतात. वाचन हा एक उत्तम छंद आहे. वाचन हे वेगवेगळ्या भाषेतून करता येते. परंतु मातृभाषेतून केलेले वाचन वाचायला आणि समजायला सोपे जाते. वाचनामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते. व्यक्तीच्या शब्द संपत्ती मध्ये वाढ होते. वाचनामुळे मानवी जीवनाला नवीन दिशा मिळते. वाचनामुळे व्यक्ती आधुनिक जगाशी जोडला जातो.
चांगली पुस्तके तुमच्यावर, तुमच्या विचारांवर सकारात्मक प्रभाव टाकतात आणि तुमच्या आयुष्याला योग्य दिशेस नेतात. वाचनामुळे आपल्याला योग्य काय ,अयोग्य काय याची उकल होते. वाचनामुळे आपल्याला चांगल्या सवयी अवगत होतात. वाचन हे मानवाला अंतर्मुख बनवते. वाचनामुळे लेखनाची कला अवगत होण्यास मदत होते. वाचनामुळे व्यक्तीचा तणाव दूर होण्यास मदत होते. ज्यांचा छंद वाचन आहे अशा व्यक्ती कधीच एकट्या राहू शकत नाही. पुस्तके ही आपले सर्वात चांगले गुरू आहेत. वाचनामुळे आपल्याला आपली संस्कृती परंपरा इतिहास अशा अनेक गोष्टींची माहिती मिळते. ग्रंथातून आपल्याला जीवनाची मूल्ये उमगतात. जीवनाचे महत्त्व समजते. चांगली पुस्तके केवळ तुमचे मित्र नव्हे तर उत्तम शिक्षक देखील बनू शकतात. पुस्तकातून
आपल्याला वेगवेगळ्या व्यक्तींचे अनुभव वाचायला मिळतात. त्यातल्या चांगल्या अनुभवांचा वापर आपण आपल्या जीवनात करू शकतो. सहाजिकच त्यामुळे चुका टाळता येतात. वाचनामुळे महान थोर व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष त्यांची जीवनशैली, त्यांची तत्वे त्यांचे थोर पण यांची माहिती मिळते. या थोर व्यक्तींचे विचार कळतात विचारधारा समजते. त्यांच्यातील चांगले गुण आपणास आत्मसाद करून घेता येतात. वाचनामुळे इतिहासातील चुकांची माहिती होते व भावी आयुष्यात त्या चुका टाळता येतात. वाचनामुळे व्यक्ती हा सर्वगुणसंपन्न होतो व त्याच्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. वाचनामुळे खूप गोष्टी साध्य करता येतात. म्हणूनच म्हणतात वाचाल तर वाचाल ….

—– सौ. निकिता यादव